

जालन्याचे उद्योजक गोविंद घनश्यामदास गोयल यांना ‘ग्लोबल यूथ आयकॉन २०२६’ पुरस्कार
इजिप्तमध्ये पार पडलेल्या ‘वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स’मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान
जालना (प्रतिनिधी) : जालना येथील सुप्रसिद्ध उद्योजक तथा कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. गोविंद घनश्यामदास गोयल यांना ‘ग्लोबल यूथ आयकॉन २०२६’ (Global Youth Icon 2026) या मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार लोकमततर्फे आयोजित ‘वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स’ अंतर्गत इजिप्त येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. या समिटसाठी गोविंद गोयल यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी त्यांच्या उद्योग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामगिरीसोबतच सामाजिक बांधिलकी आणि नागरी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘ग्लोबल आयकॉन अवॉर्ड फॉर इमर्जिंग एन्ट्रेप्रेन्युअर विथ सोशल इम्पॅक्ट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्योग उभारताना केवळ नफा नव्हे, तर समाज, पर्यावरण आणि स्थानिक विकास यांचा समतोल राखण्याचा दृष्टिकोन गोविंद गोयल यांनी कायम जपला आहे. रोजगारनिर्मिती, स्थानिक युवकांना संधी, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि जबाबदार कॉर्पोरेट संस्कृती यामुळे ते नव्या पिढीतील आदर्श उद्योजक म्हणून ओळखले जातात. याच कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार अमृता देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांच्या हस्ते गोविंद गोयल यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विविध देशांतील उद्योजक, धोरणकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंद गोयल यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. त्यांच्या यशाबद्दल उद्योग क्षेत्र, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योग आणि समाज यांचा समन्वय साधत जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे गोविंद गोयल हे नव्या भारताचे प्रतिनिधित्व करतात, अशी भावना या पुरस्कारानिमित्त व्यक्त केली जात आहे.
