
सहकार बँक कॉलनीत श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन
रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रक्तदानाचे आवाहन
जालना (प्रतिनिधी) : सहकार बँक कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जालना शहर व परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अपघात, शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, ही गंभीर बाब लक्षात घेऊनच या पावन दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर विश्वस्त मंडळाने दिली आहे. रक्तदान हे महादान असून एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमात नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे विश्वस्त, सेवाभावी कार्यकर्ते आणि स्वयंसेवक प्रयत्नशील असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
