मंठा पोलीस ठाण्यातच ‘हप्त्याचा खेळ’ उघड

एसीबीच्या सापळ्यात पोलीस अमलदार आणि पोलीस निरीक्षक जाळ्यात

मंठा (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यातच ‘हप्त्याचा खेळ’ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात पोलीस अमलदार आणि पोलीस निरीक्षक दोघेही अडकले आहेत. वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केल्याचा आरोप असून त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अमलदार रवी गणपत जाधव (वय ३८) आणि पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड (वय ५०) यांनी एका टिप्पर मालकाकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांचा मासिक हप्ता मागण्यात आला होता. त्यातील १० हजार रुपये आधीच घेतले असून उर्वरित रक्कम देण्यास सांगितले होते. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे धाव घेतली. १२ मार्च रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी पोलीस अमलदाराने ५० हजार रुपयांचा हप्ता आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये अशी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलीस निरीक्षक राठोड यांनीही या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. तडजोडीनंतर ३० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले आणि त्यानुसार सापळा रचण्यात आला. एसीबीच्या पथकाने मंठा पोलीस ठाण्यातच सापळा लावला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताच पोलीस अमलदार रवी जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपी रवी जाधव यांच्या अंगझडतीत ३० हजार रुपयांची लाच रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. दुसऱ्या आरोपीकडूनही मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. तसेच घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांनी केले असून मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे होते. तपास उपअधीक्षक बाळू जाधवर करत आहेत.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!