देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या टोळीला खाकीचा चपराक


देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या टोळीला खाकीचा चपराक

बनावट नोटांच्या दहशतीवर अंबड पोलिसांचा घणाघात; 1.22 लाखांच्या बनावट नोटा जप्त; रॅकेटचे पाळेमुळे उखडली

अंबड/जहीर शेख

भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळे करण्याच्या उद्देशाने बनावट नोटांचा काळा बाजार चालवणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी जोरदार धक्का देत अक्षरशः नेस्तनाबूत केले आहे. पोलिसांच्या अचूक माहितीवर आधारित धडाकेबाज कारवाईत ५०० रुपयांच्या २४४ बनावट नोटा, एकूण किंमत १ लाख २२ हजार, जप्त करण्यात आली असून या रॅकेटमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. देशविरोधी स्वरूपाचे कृत्य करत सर्वसामान्य जनतेची आर्थिक फसवणूक करण्याचा डाव पोलिसांनी वेळीच हाणून पाडला आहे. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी अंबड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंबड परिसरात काही इसम ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा साठा करून त्यांची चलनात उलाढाल करण्याच्या तयारीत आहेत. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता अंबड–पाचोड रोडवर सापळा रचला. संशयित विकास अनिल गडगुळ (वय २६, रा. शिवाजीनगर, अंबड) व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलअपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणीउपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडकेपोउपनि भगवान नरोडेपोहेकॉ अरुण मुंढे, दिपक पाटील, यशवंत मुंढेपोअं संजय क्षीरसागर, केंद्रे, राऊत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

खाकीचा दरारा दिसताच साखळी उघड…!पोलीस चौकशीत आरोपी विकास गडगुळ याने गुन्ह्याची कबुली देताच समरवीर सुनील खरात (वय २१) याचे नाव पुढे आले. तपास अधिक खोलात जाताच या रॅकेटचे धागेदोरे जालना व औरंगाबादपर्यंत पसरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आकाश नारायण शेळके (रा. जालना) व आदित्य अमित गायकवाड (रा. औरंगाबाद) ही नावे समोर येताच पोलिसांनी संपूर्ण साखळीवर घाव घालत रॅकेटचा कणा मोडून काढला. तसेच बनावट नोटांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत ५०० च्या २४४ बनावट नोटा एकूण किंमत १,२२,००० जप्त केल्या आहेत. या नोटा बाजारात चलनात आणून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचा आणि आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्याचा कट आरोपींनी रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस कोठडीची हवा दाखवण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे देशविरोधी, अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणाऱ्या गुन्हेगारांसाठी थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!