
सोनल नगरात गजानन विजय ग्रंथाचे ऐतिहासिक पारायण!
200 भाविकांचा सहभाग,आज प्रकट दिन सोहळा
जालना (प्रतिनिधी): संतश्रेष्ठ,योगीराज श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सोनल नगर भागातील श्री गजानन महाराज संस्थान च्या वतीने शनिवारी ( ता.07) गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय सामूहिक पारायण करण्यात आले.तब्बल 200 भाविकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत जिल्ह्यात प्रथमच सामुहिक पारायणाचा इतिहास घडवला.
प्रकट दिनानिमित्त सोनल नगरात दोन दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे .शुक्रवारी (ता.06) सकाळी श्रींची पूजा, सायंकाळी हरिपाठ ,आरती, रात्री 08.30 ते 10.30 या वेळेत ह. भ. प. आप्पासाहेब महाराज मुळे यांचे हरिकीर्तन झाले.शनिवारी (ता.07) सकाळी श्रींची पूजा, नगरसेवक विक्रांत ढक्का यांच्या हस्ते आरती, सकाळी नऊ ते पाच या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले.यात महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वाचन केले. गण गण गणात बोते चा गजर आणि गजानन महाराजांची बावन्नी घेण्यात आली.
सायंकाळी 05.00 वा. श्री संत सद्गुरु प्रेमानंद बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा हरिपाठ ,श्रींची आरती ,प्रसाद, ह. भ .प .विष्णु महाराज बारड ( रेवगाव) यांचे हरिकीर्तन झाले.
दरम्यान रविवारी ( ता.08) पहाटे श्रींची पूजा व अभिषेक,सकाळी सहा ते दहा या वेळेत नगरप्रदक्षिणा ( शोभायात्रा), सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत भागवताचार्य ह.भ. प .श्री सतीश महाराज बनकर यांचे काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
