
खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
जालना (प्रतिनिधी):
जालना शहरातील दोन तरुणांचा खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या मोहिमेत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) वडारवाडी शिवारात घडली. सिध्दार्थ संजय हरबळे (वय १६, रा. समर्थनगर, जालना) आणि जस्मितसिंग रिहाल (वय १८, रा. संभाजीनगर, जालना) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे जालना शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो काढताच पोहण्याचा निर्णय
शनिवारी दुपारी समर्थनगर व संभाजीनगर येथील चार मित्र वडारवाडी शिवारातील जेल परिसराजवळील खडकतलाव खदानीत पोहण्यासाठी गेले होते. पावसाळ्यामुळे खदानीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. सुरुवातीला चौघांनी परिसरात फोटोसेशन केले. त्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. यातील दोघांना पोहता येत होते, मात्र सिध्दार्थ हरबळे आणि जस्मितसिंग रिहाल या दोघांना पोहता न आल्याने ते पाण्यात खोलवर गेले आणि बुडाले.
मित्रांची मदतीसाठी धावपळ
घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत गावात धाव घेतली. गावातील काही तरुण तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्यात शोध घेऊन सिध्दार्थ व जस्मितसिंगला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
घटनास्थळी मोठी गर्दी
घटना समजताच गावकरी तसेच नातेवाईक घटनास्थळी धावले. एकाच वेळी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
पोलिसांचा पंचनामा व पुढील कार्यवाही
माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी मदन गायकवाड, सचिन आर्य व डी.सी. मेहेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस शिपाई मदन गायकवाड करीत आहेत.

अत्यंत दुर्दैवी घटना.
Om