आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
अनुदान घोटाळा प्रकरण – 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
जालना (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आपत्ती अनुदान निधीतील मोठ्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा, जालना यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अंबड येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणातील १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.
घोटाळ्याची पार्श्वभूमी
सन 2022, 2023 व 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर, नापिकी, अवेळी पाऊस व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने चार वेळा निर्णय घेऊन अनुदान वाटपाचे आदेश दिले होते. मात्र, या अनुदानात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 453/2025 अन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
न्यायालयाचा ठोस निर्णय
काही आरोपींनी पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, श्री. गायधनी, जिल्हा व सत्र न्यायाधीश, अंबड यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून एकूण १८ आरोपींचे अर्ज फेटाळले आहेत.
बुलढाण्यातून एक आरोपी अटक
या प्रकरणातील आरोपी सुशिलकुमार दिनकर जाधव (सहाय्यक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय अंबड) यास 11 सप्टेंबर रोजी बुलढाण्यातून अटक करण्यात आली. त्यास अंबड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून, पथके रवाना करण्यात आली आहेत.
मार्गदर्शन व तपास पथक
ही कारवाई मा. अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, जालना व आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली, सिद्धार्थ माने (प्रभारी पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या तपासात सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयश वाघमारे, महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
सरकारी वकिलांची भक्कम मांडणी
आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात श्री. बाबासाहेब इंगळे, जिल्हा सरकारी वकील, जालना यांनी सरकार पक्षाची भक्कम मांडणी केली.
