कारवाया सुरू… पण मोठे मासे अजूनही मोकाट…!

प्रेस नोटमध्ये फक्त प्याद्यांची नावे, आहेत मग खरे सूत्रधार कुठे..?

पोलीस प्रशासन नेमकं गुन्हे मोडतंय की फक्त आकडे रंगवतंय?

जालना (प्रतिनिधी) : शहरात आणि जिल्ह्यात सध्या पोलिसांच्या कारवायांचा धडाका सुरू असल्याचं चित्र उभं केलं जात आहे. कुठे जुगारावर छापे, कुठे धारदार शस्त्र जप्ती, कुठे अवैध धंद्यांवर कारवाई… पण या सगळ्या कारवायांमध्ये एक गोष्ट मात्र कायम कॉमन दिसू लागली आहे. छोटे आरोपी पकडा आणि मोठ्या नावांना वाचवा गेल्या काही दिवसांत झालेल्या अनेक कारवायांमध्ये प्रेस नोट प्रसिद्ध झाल्या, फोटो झळकले, मुद्देमाल दाखवला गेला. पण प्रश्न असा की, या साखळीमागचे खरे सूत्रधार नेमके कुठे आहेत? प्रत्येक कारवाईत हातावर पोट असणारे, लहान पातळीवर काम करणारे किंवा नावालाच पुढे असलेले आरोपी समोर येतात. मात्र संपूर्ण रॅकेट चालवणारे मोठे चेहरे कायम अंधारातच राहतात. त्यामुळे ही कारवाई गुन्हेगारी मोडण्यासाठी आहे की फक्त कागदोपत्री आकडे दाखवण्यासाठी? आहे असे म्हटले तर वावगे ठरायला नको. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणांमध्ये प्रेस नोटही अर्धवट दिसू लागल्या आहेत. मुख्य आरोपींची नावे नाहीत, मोठ्या नेटवर्कचा उल्लेख नाही, आर्थिक साखळीचा तपास नाही. फक्त दोन-चार जण पकडले आणि कारवाई पूर्ण. त्यामुळे खरी फाईल बंद कपाटात आणि फक्त बातमी बाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ज्या अवैध धंद्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होते, ते फक्त दोन-चार लोकांच्या जोरावर चालत नाहीत. त्यामागे मोठे आर्थिक हितसंबंध, राजकीय पाठबळ आणि स्थानिक स्तरावरील मजबूत साखळी असते. मग प्रत्येक वेळी फक्त छोटे चेहरेच का समोर येतात. मोठ्यांना हात लावायचा नाही आणि छोट्यांवर कारवाई दाखवायची ही पद्धत असेल तर गुन्हेगारी कधीच थांबणार नाही. कारण जुगार, अवैध वाळू, गुटखा, शस्त्रसाठा किंवा अनैतिक व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात मुख्य सूत्रधार वेगळे आणि पकडले जाणारे लोक वेगळे असे का होते. तसेच कारवाईच्या प्रेस नोटमध्ये अर्धी माहिती गायब का असते? पोलिसांनी जनतेसमोर संपूर्ण सत्य ठेवायला भीती कसली? की मलिदा पुरविला जातो म्हणून सोडले तर जात नाही ना? गुन्हेगारीवर खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल तर फक्त धाड टाकून फोटो काढणे पुरेसे नाही, तर संपूर्ण साखळी उघड करावी लागेल. प्रेस नोटच्या कारवाया आणि प्रत्यक्ष परिणाम यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. जर प्रशासनाने खऱ्या सूत्रधारांपर्यंत हात पोहोचवला नाही, तर ही कारवाई फक्त दिखावा ठरेल. गुन्हेगारांच्या साम्राज्यावर हातोडा पडणार की फक्त बातम्यांमध्ये धूर सोडला जाणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!