शेतकऱ्याच्या विहिरीवर डल्ला; ३७ हजारांचा सोलार पंप लंपास

शेतकऱ्याच्या विहिरीवर डल्ला

३७ हजारांचा सोलार पंप लंपास; अनुदानातील साधनांवर चोरट्यांचा हात, ग्रामीण भागात भीतीचे सावट

जालना (प्रतिनिधी) : हिवर्डी (ता. जालना) येथील शेतकरी भगवान विठ्ठलराव भुतेकर (वय ४०) यांच्या शेतातील विहिरीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ३७ हजार रुपयांचा सोलार पंप व साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय अनुदानातून बसवलेली शक्ती कंपनीची सोलार मोटारच चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दि. २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ नंतर ते ३० जानेवारी रोजी सकाळी ९ या दरम्यान ही चोरी घडली. दुसऱ्या दिवशी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या भुतेकर यांना विहिरीवरील मोटार, स्टार्टर, ६० फूट केबल व पाईप गायब आढळले. शोध घेऊनही साहित्य सापडले नाही. अखेर भौजपुरी पोलीस ठाण्यात तोंडी फिर्याद देण्यात आली आहे.

चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये २० हजारांची सोलार मोटार, १० हजारांचा स्टार्टर, ५ हजारांची केबल व २ हजारांचा पाईप असा एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी अत्यावश्यक असलेली साधनेच सुरक्षित नसतील तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हा उघड करून आरोपींना अटक करावी व ग्रामीण भागातील शेतसामग्री चोरीच्या घटनांवर कठोर आळा घालावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!