गुटखा माफियावर धाड – पण लाला मात्र अजूनही मोकाट…!

गुटखा माफियावर धाड – पण लाला मात्र अजूनही मोकाट…!

जालना (प्रतिनिधी) : दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस ठाणे तालुका, जालना यांना वरिष्ठांकडून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सतिश उर्फ लाला जैस्वाल रा. जालना हा त्याचे हस्तकांमार्फत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणार असल्याचे समजले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी देऊळगाव राजा – जालना मार्गावर सापळा लावून, मौजे बोरखेडी येथे पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप (क्र. MH 21 X 1058) ला थांबविले. वाहनचालक मात्र पोलिसांना चकमा देत पसार झाला. वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये तब्बल ₹9,56,250 किमतीचा गुटखा आढळला. त्याचबरोबर वाहनाची किंमत अंदाजे ₹5,00,000 असून, अशा प्रकारे एकूण ₹14,56,250/- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक श्री. एस.आर. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एल. अंतरप, पो.उपनि. एस.एस. नागरगोजे व अंमलदार बळीराम तळपे, अभिषेक शिरगुळे यांनी केली.

लालावर MPDA अंतर्गत कारवाई का नाही…?

गुटख्याचा एवढा मोठा साठा हेरून पोलिसांनी जप्ती केली, पण लाला अजूनही मोकाट फिरतोय हा सर्वसामान्य जनतेच्या मनातील मोठा प्रश्न आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गुटखा पकडला जातोय, वाहने जप्त होतात, लाखो रुपयांचा मुद्देमाल सापडतो… मात्र या सगळ्या कारवायांमध्ये मुख्य सूत्रधार लाला जैस्वाल का अजूनही तुरुंगाबाहेर आहे?

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे – अशा गुन्हेगारांविरुद्ध MPDA (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज) अंतर्गत कारवाई करणे अपेक्षित असताना, त्याकडे पोलिस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे?

पोलीस अधीक्षक साहेब, एवढं गुपित काय…?

सामान्य नागरिक विचारतोय – एसपी साहेब, आपण लालाच्या एवढे आहारी का गेलात?
फक्त हप्त्याच्या मोहामुळे का…?

लक्षात ठेवा – पैसा सर्वस्व नाही. माणूस आहे म्हणून पैसा आहे. समाज उद्ध्वस्त करणाऱ्या लाला सारख्या ‘रावणाला’ जर वेळेत जेरबंद केलं नाही, तर उद्या जालना जिल्ह्यातील युवकांचे आरोग्य, भविष्य आणि समाज दोन्ही गटांगळ्या खाताना दिसेल. जनता आता एका घोषणेची वाट पाहतेय गुटखा माफिया लाला जैस्वाल MPDA अंतर्गत जेरबंद झालाच पाहिजे.

व्यसनमुक्तीचे धडे आणि गुटखा माफियाची मस्ती – पोलिसांना सामान्यांचा सवाल!

अलीकडेच जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यसनमुक्ती व नशाबंदीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन तिचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अधिकारी मंडळींनी व्यासपीठावरून युवकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून सांगितले, आरोग्यदायी जीवनाचे धडे दिले.

पण त्याच वेळी जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा माफिया सतीश उर्फ लाला जैस्वाल मात्र अजूनही मोकाट फिरतोय. शाळकरी मुलांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हजारो लोकांना गुटख्याच्या व्यसनाच्या विळख्यात ओढून मरणाच्या दारात लोटणारा हा बागड बिल्ला पोलिसांना का सापडत नाही? असा तिखट सवाल आता जनतेतून उपस्थित केला जातो आहे.

लोकांचा सवाल – मग या कार्यक्रमांचा काय उपयोग?

जनतेच्या मनात खदखद आहे की, व्यासपीठावर व्यसनमुक्तीचे गोडवे गायचे, नशाबंदीबाबत उपदेश द्यायचे, बक्षिसे वाटायची आणि दुसरीकडे गुटखा माफियाला गुपचूप पाठीशी घालायची…? जर लाला सारखे गुटखा माफिया राक्षसच पोलिसांना सापडत नसतील, तर अशा प्रश्नमंजुषा व उपदेशपर कार्यक्रमांचा नेमका काय उपयोग?

खऱ्या व्यसनमुक्तीची सुरुवात कुठून व्हायला हवी?

गुटखा, मावा, तंबाखू यांचे रॅकेट चालवणाऱ्या माफियांवर जर MPDA अंतर्गत कठोर कारवाई झाली, तरच व्यसनमुक्ती मोहिमेला अर्थ प्राप्त होईल.
नाहीतर व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमांचे रंगीबेरंगी फोटो काढणे आणि भाषणे झोडणे याशिवाय पोलिस प्रशासनाकडे दाखवण्यासारखे काही उरणार नाही. लाला सारख्या बागड बिल्ल्याला पकडा – मगच व्यसनमुक्तीचे धडे खऱ्या अर्थाने पटतील असाही सवाल उपस्थित होत आहे .

|Share

One thought on “गुटखा माफियावर धाड – पण लाला मात्र अजूनही मोकाट…!

  1. गुटखा,रेशन तांदूळ,अवैध दारू यांच्यावर जेव्हढे छापे टाकले जातात ते फक्त देखाव्यासाठी…… आजपर्यंत या छाप्यात मालक कधीच सापडत नाही, त्यांचे नोकर सापडले जातात. केसेस चुकीच्या पद्धतीने नोंद करतात.
    एकाही केस मध्ये कोणालाही शिक्षा झाल्याचे ऐकावीत नाहीत. वास्तविक हे सर्व देशद्रोही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!