…त्या प्रकरणातील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

…त्या प्रकरणातील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

घनसावंगी  (प्रतिनिधी) : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील गाजलेल्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून स्थानिक गुन्हे शाखेने दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल ६४ हजार ८९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील सात घरफोड्यांची कबुली दिली आहे.

तब्बल १९ लाखांचा दागिने लंपास

कुंभारपिंपळगाव येथे २३ जुलै रोजी ज्ञानेश्वरी ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याची नोंद घनसावंगी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी शक्ती उर्फ शक्तीमान प्रल्हादसिंग टाक याला पूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचे दोन साथीदार फरार होते.

फरार आरोपींना सापळ्यात पकडले

शनिवारी (दि. २३) सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी राजूर-चौफुली येथे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.

अटक करण्यात आलेले आरोपी असे आहेत. किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक (रा. द्वारकानगर, जालना), गजानन विठ्ठल बरडे (रा. रामनगर, साखर कारखाना, जालना), किशोर टाक याच्याकडून ६४,८९२ रुपयांचा चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कबुली दिलेले गुन्हे

चौकशीत आरोपींनी खालील ठिकाणांतील घरफोड्यांची कबुली दिली –

  • अंबड
  • जालना तालुका
  • फत्तेपुर (जळगाव)
  • वडोद बाजार (छत्रपती संभाजीनगर)

याशिवाय आरोपी गजानन बरडे याने चंदनझिरा व जालना तालुका परिसरात डिझेल चोरीचे दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

पुढील तपासासाठी घनसावंगी पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी घनसावंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, तसेच सॅम्युअल कांबळे, लक्ष्मीकांत आडेप, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, भाऊराव गायके, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, सुधीर वाघमारे, प्रशांत लोखंडे, दिपक घुगे, इरशाद पटेल, संदीप चिचोले, देविदास भोजणे, कैलास खाडे, सतिप श्रीवास, आक्रुर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे व भरत कडुळे यांनी विशेष मेहनत घेतली.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!