घरकुल लाभार्थ्याकडून 30 हजारांची लाच घेताना गृहनिर्माण अभियंता रंगेहात
जालना/घनसावंगी :
घरकुल योजनेत लाभार्थ्यास दुसरे घरकुल मंजूर करून देण्यासाठी तब्बल 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या घनसावंगी पंचायत समितीच्या कंत्राटी गृहनिर्माण अभियंता विशाल विठ्ठलराव कनोजे यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लाभार्थ्याला दुसरे घरकुल मिळावे म्हणून अभियंता कनोजे यांनी पैशांची मागणी केली होती. लाभार्थ्याने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. तक्रारीची खात्री करून घेण्यात आल्यानंतर आज घनसावंगी येथे सापळा रचण्यात आला आणि कनोजे यांनी 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यांना ACB च्या पथकाने अटक केली.
या कारवाईनंतर पंचायत समितीतील इतर कर्मचाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
