शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून लढा तीव्र करावा 

शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांची उपोषणस्थळी भेट

शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून लढा तीव्र करावा; उपोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास ‘रस्त्याची लढाई’ छेडण्याचा निर्धार

जालना (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला राजकीय पाठबळ मिळू लागले असून, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही, तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असा स्पष्ट इशारा वडले यांनी दिला. या वेळी काजळा गावातील रहिवासी तसेच रोशनगाव, बठाण, शेलगाव, गोला, पांगरी आणि रामनगर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत, उपोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा ठाम निर्णय यावेळी घेतला. लक्ष्मण वडले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन गंभीर नाही. केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. आता शांत मार्गाने आवाज ऐकला जात नसेल, तर लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी डॉ. नागरे यांनी उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची आरोग्य तपासणी केली. तपासणीत त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सततच्या उपोषणामुळे प्रकृतीवर परिणाम होत असूनही, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असतानाही प्रशासनाकडून ठोस तोडगा न निघाल्याने संताप वाढत आहे. आता या आंदोलनाला कोणते वळण मिळते, प्रशासन तातडीने दखल घेते का, की शेतकरी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!