
सरकारी तिजोरी लुटणारा ‘तहसीलमधला डॉन’ अखेर गजाआड!
शेतकऱ्यांच्या अश्रूंवर डल्ला…!
पाच महिने फरार… देवळं, धर्मशाळा अन् ठिकाणं बदलली; पण ‘आर्थिक गुन्हे शाखे’च्या पो. नि. मिथुन घुगे यांच्या जाळ्यातून सुटका नाही…!
जालना (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. घनसावंगी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखा, जालना यांनी अटक करताच 24 कोटी 90 लाखांच्या नैसर्गिक अनुदान घोटाळ्याचा आणखी एक चेहरा उघडा पडला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जी.आर. काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. मात्र, शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा दलाल-अधिकाऱ्यांच्या घशात घालण्याचा हा काळा कारनामा याच काळात घडला. बोगस नावे, बनावट शेती, आणि यामधून कोट्यवधींची लूट झाली. अनुदान यादी अपलोड करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतीच नसलेल्या नावांवर अनुदान मंजूर करून ती रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आणि धक्कादायक सत्य समोर आले. तब्बल 24,90,77,811 रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्र. 453/2025 BNS अंतर्गत गंभीर कलमे व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्य आरोपी आशिष पैठणकर हा तब्बल पाच महिने फरार होता. मोबाईल बदलणे, ठिकाणे बदलणे, वेगवेगळ्या धार्मिक स्थळी वास्तव्य करणे, अटकपूर्व जामिनासाठी आटोकाट प्रयत्न केले पण आर्थिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषणासमोर सर्व फसले. गोपनीय माहितीच्या आधारे तो जालना येथे येत असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. तपासात उघड झाले की, आशिष पैठणकरने गावोगावी एजंट नेमून बोगस नावे अनुदान यादीत टाकली आणि कोट्यवधींचा सरकारी पैसा लाटला. आता त्याच्या चौकशीतून अजून अनेक मोठी नावे बाहेर येण्याची दाट शक्यता असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 32 आरोपींना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रभारी उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
