मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला पक्का वैरी


मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला पक्का वैरी

जिवे मारण्याची दिली धमकी;जवाहरबाग परिसर हादरला

सदर बाजार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यावर न थांबता,  वृद्धाच्या सुरक्षिततेसाठी कडक भूमिका घ्यावी 

जालना (प्रतिनिधी) :  शहरातील जवाहरबाग परिसरात मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्ध भावाला शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वाद आता थेट हिंसक टप्प्यावर पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फिर्यादी कपील कर्दमऋषी व्यास (वय ७२), व्यवसाय पूजापाठ, रा. जवाहरबाग, जालना असून आरोपी प्रकाश कर्दमऋषी व्यास हा त्यांचा सख्खा भाऊ आहे. दि. २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास जवाहरबाग, जालना येथे मालमत्तेच्या वादातून आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे वृद्ध व्यक्ती मानसिकरीत्या भयभीत झाल्याचे सांगितले जात असून, घरगुती वादातून वृद्धांवर होणाऱ्या अत्याचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात N.C. No. 83/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115 (2), 351 (2), 352 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाची नोंद पोहेक/93 आगळ यांनी केली असून, पुढील तपास पाहेक/327 लिहीणार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाकडून वृद्ध भावावर हात उचलला जातो, हे केवळ कायद्याच्या दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत गंभीर आहे. घरगुती वाद सोडवण्यासाठी कायदा असताना हिंसाचाराचा मार्ग का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्ह्यावर न थांबता, पीडित वृद्धाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक व कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!