

एसपी साहेब… जालना शहर शहर कुठे चाललंय…?
दिवसा ढवळ्या तलवारीच्या वाराने युवकाचा खून… नूतन वसाहतीत खळबळ; कधी सुधारणार कायदा-सुव्यवस्था? सामान्य नागरिकांचा थेट प्रश्न
जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील नूतन वसाहत भागात गुरुवारी दुपारी झालेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात, गर्दीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडताच कदीम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्याकांडानंतर जालना शहरातील नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांकडे लक्ष वेधत प्रशासनावर भले मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीरपणे ढासळत असल्याची भावना देखील या भागात असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मृत युवकावर ३ ते ४ जणांनी मोटरसायकलवर येऊन अचानक हल्ला केला. आरोपींपैकी एकाने धारदार शस्त्राने सलग वार केले, त्यानंतर सर्व आरोपी काही क्षणांत पळून गेले. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. परिसरातील दुकानांपुढे गोंधळ उडाला, लोकांनी दुकाने बंद करून जीव मुठीत धरला. काहींनी मोबाईलवरून पोलिसांना माहिती देताच कदीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. आठवडाभरापूर्वी घडलेली मारहाण, त्याआधीचे चेन स्नॅचिंग, तरुणांमधील गटांदरम्यानच्या झटापटी या घटनांचा उल्लेख करत नागरिकांनी सोशल मीडियावरून प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. या ठिकाणच्या एका रहिवाशाने सांगितले दिवसाढवळ्या तलवारी फिरत असतील तर सामान्य नागरिकांनी घराबाहेर पडावे कसे? मुलांना शाळेत सोडायलाही भीती वाटते. तर दुसरे एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे. दोन दिवस कडक कारवाई होते, मग पुन्हा सगळं जुनेच. गुन्हेगारांना भीतीच नाही उरली. काही नागरिकांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला स्थानिक गुन्हेगार टोळ्यांचा दबदबा, नशेच्या पदार्थांचे वाढते प्रमाण आणि काही अंशी पोलिस गस्तीत असलेली ढिलाई जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जालन्यात धारदार शस्त्रांनी हल्ले, गॅंगमधील तुफानी भांडणे, चेन स्नॅचिंग, व्यसनाधीन तरुणांकडून होणारे गुन्हे खुलेआम फिरणाऱ्या टोळ्या या घटना अधूनमधून घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. नूतन वसाहत, जुना मोंढा, साईनगर, अंबड रोड परिसरात अशा घटनांमुळे नागरिकांनी अनेकवेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याची माहिती मिळते. मात्र प्रभावी पातळीवर नियंत्रण आणण्यात सातत्य नसल्याची टीका नागरिकांतून होत आहे. व्यापाऱ्याने माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला की, कायद्याचा धाक संपला आहे. गुन्हेगार दिवसाढवळ्या हल्ले करतायत. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी कडक गस्त, नाकाबंदी आणि छापे वाढवले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
जालण्याचा बिहार…?
घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी नाराजी दिसून आली. काही स्थानिकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅप गटांमध्ये स्पष्ट शब्दांत प्रश्न विचारले आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशा वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जालना बिहारसारखे होत चालले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या या टिप्पण्या हे शहरातील वाढत्या असुरक्षिततेचे निदर्शक मानले जात आहेत. काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः शहरातील काही कर्मचाऱ्यांवर वसुलीचे आरोप, स्थानिक पातळीवर गुन्हेगारांशी सैल वर्तन आणि गस्त व्यवस्थेतील कमतरता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र हे आरोप अद्याप अधिकृत स्वरूपात सिद्ध झालेले नसून, हे नागरिकांचे असंतोषपूर्ण मत असे मानावे लागते. गुन्हेगारांना शोधून कठोर शिक्षा दिली पाहिजे. पोलिसांनी गस्तीचे तास वाढवून संवेदनशील भागांत स्थिर पथके तैनात करावीत. शहरात सीसीटीव्ही नेटवर्क वाढवावे.
आरोपी लवकरच पकडले जातील : पोलीस निरीक्षक शेवाळे
कदीम पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी सांगितले की, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे. संशयित आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात येत आहे. ही गंभीर घटना आहे. आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाहीत. लवकरच याप्रकरणात मोठी कारवाई होईल असे पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी सांगितले. या प्रकरणात गुन्हेगारांचे स्वरूप तपासात स्पष्ट होईल. प्राथमिकरीत्या परिसरातील जुन्या वादातून हल्ला झाला का?, तरुणांमधील गँग वाद यात कारणीभूत आहे का?, पूर्वनियोजित कट होता का?, नशेच्या व्यवहाराशी संबंध आहे का? या काही प्रमुख मुद्द्यांचा तपास पोलीस करीत आहेत.
भीतीमुक्त वातावरण द्या; नागरिक
जालना शहर हे व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीचे मोठे केंद्र आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या हल्ल्यांमुळे प्रशासनावरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक प्रशासनाकडे प्रमुख मागण्या करत आहेत. शहरभर गस्तीची चक्र वाढवावीत, संवेदनशील भागात स्थिर पोलीस पथके, तलवारी-चाकू धारकांवर विशेष मोहीम, रात्र-अभियान आणि नाकाबंदी वाढवावी, गुन्हेगारांवर MPA व इतर कडक कलमे लावावीत.
…जालना सुरक्षित बनेल का?
या हत्याकांडाने शहरातील कमकुवत होतेय असे जाणवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला आणखी धार दिली आहे. गुन्हेगारांना अटक होईलच, पण जालना पुन्हा सुरळीत, सुरक्षित आणि भीतीमुक्त होण्यासाठी नागरिकांचा विश्वास, प्रशासनाची तत्परता आणि पोलिस दलाची कडक व सातत्यपूर्ण कारवाई अत्यावश्यक असल्याची भावना शहरभर व्यक्त होत आहे. आता जालनेकरांचा फक्त एकच प्रश्न आता तरी प्रशासन जागे होणार का…?
