
निमखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे उसाचे मोठे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांचा जाफराबाद येथे रस्ता रोको
जाफराबाद: जाफराबाद तालुक्यातील निमखेडा गावात रविवारी सायंकाळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणावर उसाचे नुकसान झाले आहे. सुमारे ३० ते ४० एकर क्षेत्रातील उसाच्या पिकाला आग लागून सर्वस्व भस्मसात झाले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीने पंचनामे व मदतीची मागणी होत आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नुकसानीच्या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात निमखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी जाफराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शॉर्टसर्किट झाले. योग्य देखभाल न झाल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने सर्व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजावून रस्ता मोकळा करून दिला. तालुका प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते.
