

सर्वसामान्यांचा भाई : सुधाकर निकाळजे यांची कष्टातून उभी केलेली माणुसकीची ओळख
जालना (प्रतिनिधी) : माझे मामा रमेश झिंगराजी शिंदे यांनी मला रिक्षा शिकवली, त्यामुळेच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकलो. आज मी त्यांच्यावरचा ऋण फेडण्यासाठी माझ्या गरीब मामाला नवीन रिक्षा घेऊन दिली आहे. हे उद्गार आहेत जालना शहरातील सर्वसामान्यांचा भाई म्हणून ओळखले जाणारे सुधाकर निकाळजे यांचे.
सुधाकर भाईंचे आयुष्य म्हणजे संघर्ष, मेहनत आणि माणुसकीचा उत्तम संगम. त्यांनी जगण्याची सुरुवात केली ती अगदी साध्या, परंतु अत्यंत कठीण परिस्थितीतून. नगरपालिकेतील नाली सफाईचे काम करताना त्यांना टीबीसारखा गंभीर आजार झाला. या आजारामुळे कोणीही त्यांना काम देण्यास तयार नव्हते. संसार हातातून निसटतोय अशी वेळ आली होती. मात्र, त्या काळात त्यांचे मामा रमेश झिंगराजी शिंदे यांनी आधार दिला त्यांनी सुधाकर भाईंना रिक्षा चालवायला शिकवले. त्या रिक्षाच्या हँडलवर हात ठेवतानाच सुधाकर भाईंनी ठरवले की “मी फक्त रिक्षाचालक राहणार नाही, तर या वर्गातील लोकांसाठी काहीतरी मोठं करणार! त्याच जिद्दीने त्यांनी जीवनाचा प्रवास सुरू ठेवला. दिवसेंदिवस मेहनत करत, लोकांशी माणुसकीने वागत त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज सुधाकर निकाळजे केवळ एक यशस्वी व्यक्ती नाहीत, तर सामान्यांचा आधारस्तंभ ठरले आहेत. गरीब, मजूर, दलित, रिक्षाचालक, शेतमजूर, असंघटित कामगार — सगळ्यांसाठी ते नेहमी उभे राहतात. कोणत्याही जाती-पातीत फरक न करता “माणूस” हा एकच धर्म मानणारे सुधाकर भाई समाजात दलित आणि सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात.
त्यांनी फक्त स्वतःचा संसार सावरला नाही, तर इतरांच्या संसारालाही दिशा दिली आहे. शेती डेव्हलपमेंट क्षेत्रात त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. कोणाचे घर उध्वस्त होऊ नये, कोणाचे आयुष्य अंधारात जाऊ नये, यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतःचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च केला आहे. आज त्यांनी आपल्या मामाला नवीन रिक्षा भेट देऊन एक कृतज्ञतेचा सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ज्यांनी त्यांच्या जीवनाला दिशा दिली, त्यांच्याच हातात पुन्हा सन्मानाची किल्ली दिल्याने या घटनेने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. लोकांमध्ये आज एकच चर्चा आहे सुधाकर भाई म्हणजे फक्त समाजसेवक नाहीत, तर खऱ्या अर्थाने माणसांचे माणूस आहेत!
