जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीवर संशयाचे सावट; तीन ते पाच लाखांचा गौडबंगाल चर्चेत

जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीवर संशयाचे सावट; तीन ते पाच लाखांचा गौडबंगाल चर्चेत

जालना (प्रतिनिधी) :  जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेला जोर आला आहे. तीन ते पाच लाख रुपये द्या आणि पोलीस पाटील व्हा अशा प्रकारचे संभाषण काही ठिकाणी ऐकू येत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या दाव्यांमुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिस पाटील पद ही ग्रामशिस्तीची जबाबदारी सांभाळणारी महत्त्वाची भूमिका मानली जाते. या भरती प्रक्रियेत अनेक तरुणांनी प्रामाणिक प्रयत्नाने परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या गुणांविषयी अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे पारदर्शकतेच्या अभावाबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांकडून प्रशासनाने या चर्चांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक तपास करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही.

बिनविरोध निवडींवरही प्रश्न

जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोलीस पाटील बिनविरोध निवडले गेल्याची माहिती मिळाली असली, तरी अशा निवडी खरंच सर्वसंमतीने झाल्या की त्यामागे इतर कारणे आहेत, यावरही चर्चा सुरू झाली आहे. काही सामाजिक संघटनांनी या पार्श्वभूमीवर संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रशासन सतर्क पण चर्चांना ऊत

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरती प्रक्रियेबाबत नियमित देखरेख ठेवली जात असल्याचे समजते. तरीही उमेदवारांमधील चर्चांमुळे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने याप्रकरणी तपासणी केली, तर अफवांना आळा बसेल, असे काहीचे मत आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक…?

स्थानिक नागरिकांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले पोलीस पाटील सारख्या जबाबदार पदासाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे. कायद्याचे पालन करणारा व लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणारा व्यक्ती जर पैशाच्या देवाणघेवाणीने निवडला जात असेल, तर याचा परिणाम गावशिस्तीवर होईल, असे मत एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!