दिवाळीनिमित्त पांजरापोळ मैदानावर ‘जय बजरंग फटाका मार्केट’मध्ये ५० दुकानांना परवानगी

दिवाळीनिमित्त पांजरापोळ मैदानावर ‘जय बजरंग फटाका मार्केट’मध्ये ५० दुकानांना परवानगी

प्रशासनाकडून ‘जय बजरंग असोसिएशन’ला ना-हरकत प्रमाणपत्र जारी

जालना (प्रतिनिधी) ;  दिवाळी २०२५च्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील श्री गौरक्षण पांजरापोळ मैदान, महेशनगर मार्केट यार्ड रोड येथे ‘जय बजरंग फटाका असोसिएशन’ च्या वतीने ५० फटाक्यांची तात्पुरती दुकाने उभारण्यास जालना महानगरपालिकेने ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मंजूर केले आहे.

ही परवानगी असोसिएशनचे अध्यक्ष गेंदालाल राजाराम झुंगे यांना देण्यात आली असून, ती दिनांक २१ ऑक्टोबर २०२५पर्यंत वैध राहणार आहे.

अग्निशमन विभागाची तपासणी व परवानगी नंतरच मंजुरी

सदर परवानगी अग्निशमन विभागाच्या जा.क्र. १११, दिनांक १६/१०/२०२५ च्या अहवालावर व असोसिएशनच्या अर्ज दिनांक १८/०९/२०२५ च्या अनुषंगाने देण्यात आली आहे.
अग्निशमन मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करूनच दुकानांची उभारणी व विक्री प्रक्रिया पार पाडावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने या परवानगीसोबत १५ अटी लागू केल्या असून, काही महत्त्वाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत :प्रत्येक दुकानामध्ये किमान ३ मीटर अंतर ठेवणे बंधनकारक. १२ मीटर रुंदीचा रस्ता फायर ब्रिगेड वाहनांसाठी मोकळा ठेवणे आवश्यक. प्रत्येक दुकानासमोर फायर एक्स्टिंग्विशर, ५०० लिटर पाणी व वाळूच्या बकेट्स ठेवणे अनिवार्य.‘नो स्मोकिंग’चे फलक लावणे आवश्यक.दुकानांचा वापर निवास किंवा साठवण म्हणून करता येणार नाही.कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ रद्द केले जाईल.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, २१ ऑक्टोबरनंतर दुकाने सुरू ठेवल्यास किंवा ५० पेक्षा जास्त दुकाने उभारल्यास ती तत्काळ हटवली जातील आणि त्याचा खर्च असोसिएशनकडून वसूल केला जाईल.

होलसेल दरात दर्जेदार फटाक्यांची विक्री

असोसिएशनचे अध्यक्ष गेंदालाल झुंगे यांनी सांगितले की, या वर्षी नागरिकांसाठी आम्ही नामांकित कंपन्यांचे, सुरक्षित व दर्जेदार फटाके होलसेल दरात उपलब्ध करून देत आहोत. ग्राहकांनी किरकोळ दुकानांमधून महाग फटाके घेण्यापेक्षा असोसिएशनच्या ५० दुकानांमधून योग्य दरात खरेदी करावी.

ते पुढे म्हणाले, आमच्याकडे विक्रीसाठी फुलबाजे, झिरप्या, लव्हली, रंगीत चक्रे, रॉकेट्स, आकाशबाज यांसह विविध आकर्षक फटाके उपलब्ध आहेत. हे सर्व फटाके ध्वनी व सुरक्षा मानकांचे पालन करणारे असून, बालक व वृद्धांसाठीही सुरक्षित आहेत.

प्रशासनाचे आवाहन : उत्सव आनंदाचा, पण जबाबदारीतून

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवावे, लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडू द्यावेत, तसेच स्वच्छतेची व सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
फटाके विक्री केंद्र शहरातील अधिकृत ठिकाणी दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील.

सुव्यवस्था बिघडल्यास किंवा नियमभंग झाल्यास ‘जय बजरंग फटाका असोसिएशन’वर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेंदालाल झुंगे यांचे आवाहन

दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. तो अपघातमुक्त व जबाबदारीने साजरा करा. दर्जेदार, सुरक्षित फटाके घ्या आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षिततेतून उत्सवाचा आनंद लुटा, असे आवाहन झुंगे यांनी नागरिकांना केले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!