
रुई गणातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार मंदाताई सूर्यवंशी – विजयाबाबत आत्मविश्वास
हदगाव : हदगाव तालुक्यातील रुई जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने, काँग्रेस पक्षाकडून मंदाताई त्र्यंबक सूर्यवंशी (हडसणी) यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते आणि हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्र्यंबक पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “पक्षाने मंदाताई सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्यास त्या या मतदारसंघातून निश्चितपणे निवडून येतील.”
मंदाताई सूर्यवंशी या स्थानिक पातळीवर लोकप्रिय व अनुभवी महिला नेत्या मानल्या जातात. ग्रामपंचायत हडसणी या पंधरा वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे, तसेच त्यांनी हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही एकहाती जिंकली आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या “स्टार प्रचारक” म्हणूनही त्यांची ओळख असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि मजबूत संघटनात्मक पाया आहे.
रुई जिल्हा परिषद गणात एकूण २२ गावे असून त्यापैकी रुई, हारडप व हडसणी या गावांमध्ये मिळून सुमारे २५०० ते ३००० मतदार आहेत. या गावांत मंदाताई सूर्यवंशी यांचा प्रभाव प्रस्थापित आहे. तसेच, मतदारसंघात मराठा समाजाचे बहुसंख्य प्रमाण, नातेसंबंध आणि विस्तृत मित्रपरिवार लक्षात घेता, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय सहज शक्य आहे, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
