काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चाचणी सुरू

काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चाचणी सुरू – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

हदगाव : हदगाव तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी चाचणी बैठकींचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हदगाव येथील निवासस्थानी रुई जिल्हा परिषद गणातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (दि. १७ ऑक्टोबर) पार पडली.

बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार जवळगावकर म्हणाले, कोण उमेदवार राहील यापेक्षा आपला उमेदवार कसा निवडून येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. राजकीय विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणारा, प्रबळ आणि जनाधार असलेला उमेदवार काँग्रेसकडून उभा राहील यासाठी सर्वांनी तन-मन लावून कामाला लागावे.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव असलेला पक्ष आहे. या पक्षात सर्व जाती-धर्मांतील कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात. आज ग्रामीण जनता राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळली असून, काँग्रेसकडेच पर्याय म्हणून पाहत आहे. त्यामुळे आपण एकदिलाने आणि संघटितपणे काम केले, तर आपला कोणताही उमेदवार पराभूत होणार नाही, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गणांतील कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढील काही दिवसांत काँग्रेसकडून प्रत्येक गणनिहाय उमेदवारांची चर्चा व अंतिम उमेदवारीसाठी शिफारसी केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!