

जगाचा जगमित्र/यादव सुखापुरे
हदगाव : हदगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एकूण 10 प्रभागांतून 20 नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष निवडून येणार आहेत. यंदा हदगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे, शिवसेना (शिंदे गट) पक्षाने पक्षनिष्ठ, जनतेच्या सेवेत सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी सौ. अरुणा राजेश तावडे यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या, माझे पती राजू तावडे हे 2009 पासून तन-मनाने पक्षनिष्ठ राहून पक्षाचे कार्य करत आहेत. पक्ष सत्तेत असो वा विरोधात — त्यांनी नेहमीच सामान्य नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देत, तत्परतेने मदत केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी त्यांची निवड उपजिल्हा रुग्णालय आरोग्य समितीवर हदगाव प्रतिनिधी म्हणून केली आहे.
सौ. अरुणा तावडे या शिवसेना महिला आघाडीच्या सक्रिय पदाधिकारी असून, त्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, जनसेवा आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढणे, महिलांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणींचे काम प्रामाणिकपणे करणे हेच माझे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, मला शिवसेना (शिंदे गट) पक्षाने हदगाव नगरपालिकेतून उमेदवारी दिल्यास, मी सक्षमपणे निवडणूक लढवून विजय संपादन करेन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास सदैव तत्पर राहीन. मी केवळ नावापुरती नगरसेविका नव्हे, तर काम करणारी प्रतिनिधी ठरेन, असे ठाम मत सौ. अरुणा राजेश तावडे यांनी व्यक्त केले.
