तालुका जालना पोलिसांनी अटक करून ‘डिल’ करत सोडले आरोपीला?
तालुका जालना ठाण्याच्या पोलिसांचा प्रताप
तपास अधिकाऱ्यावर आर्थिक व्यवहाराचा आरोप; गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी
जालना (प्रतिनिधी) : तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 680/2025 मधील तपासीक अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादी अकरम भोलू परसुवाले यांनी पोलीस अधीक्षक, जालना यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, पी.एस.आय. डिगंबर पवार यांनी आरोपींना अटक करून त्यांपैकी एक आरोपीला आर्थिक व्यवहार करून सोडून दिले.
तक्रारीनुसार, परसुवाले यांच्या काका मोहम्मद कासम परसुवाले यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तपास अधिकारी पवार यांनी तीन आरोपींना अटक केल्याचे सांगितले जाते; मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये अटक झाल्यानंतरही एक आरोपी इमाम हसन परसुवाले याला सोडून दिल्याचे दिसत आहे, असा दावा फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तपास अधिकारी जाणूनबुजून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असून, आर्थिक व्यवहार करून आरोपीला मदत केली आहे. शिवाय फिर्यादीला देखील वारंवार दबावाखाली ठेवून सुट्टी घ्या, गुन्हा मागे घ्या अशा धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फिर्यादीने सदर तपास अधिकारी पी.एस.आय. डिगंबर पवार यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची व गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत तालुका जालना पोलीस ठाणे व संबंधित अधिकाऱ्यांचा अधिकृत प्रतिसाद मिळू शकलेला नाही. पोलीस प्रशासनाकडून मात्र या तक्रारीची नोंद घेऊन चौकशी केली जाईल, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
