
तुळजापूरला जाऊन दर्शन करण्याचा आग्रह… आईवडिलांचा नकार अन… सोळा वर्षीय मुलाने संपवले जीवन
धावडा (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील लेहा गावात शनिवारी (दि.२७) दुपारी १ वाजताच्या सुमारास केवळ सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून एकुलता एक मुलगा गमावल्याने सोनुने कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडले आहे.
मृत मुलाचे नाव नैतिक सदाशीव सोनुने (वय १६) असे असून तो सरस्वती विद्यालयात दहावीत शिकत होता. नैतिक काही दिवसांपासून आपल्या मित्रांसोबत दुचाकीने तुळजापूरला जाऊन दर्शन करण्याचा आग्रह धरत होता. या संदर्भात त्याने आईवडिलांकडे वारंवार विनंती केली.
शनिवारी शाळेतून परतल्यानंतर तो शेतात काम करीत असलेल्या आईकडे गेला व आपण तुळजापूरला जाऊ का? अशी परवानगी मागितली. मात्र हवामान खराब असल्याने आईने सध्या नाही, नंतर वातावरण चांगले झाले की आपण सर्वजण जाऊ असे सांगितले. या उत्तराचा राग मनात धरून नैतिकने घरी परत येताच दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला.
नैतिकचे आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. खिडकीतून डोकावून पाहिले असता नातू नैतिक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तात्काळ नातेवाईकांनी दरवाजा फोडून त्याला खाली उतरवले व पिंपळगाव रेणुकाई येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
त्याच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नातेवाईक, मित्र व शेजाऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
