जिल्हा स्त्री रुग्णालयात दरोडा – सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, अधिकारी-कर्मचारी भयभीत!

जिल्हा स्त्री रुग्णालयात दरोडा – सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, अधिकारी-कर्मचारी भयभीत!

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय, चमन येथील क्वार्टर परिसर पुन्हा एकदा दरोडेखोरांच्या विळख्यात सापडला. दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात दरोडेखोरांनी काठ्यालाठ्यांनी धुमाकूळ घालत सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला.

सिक्युरिटी गार्ड लतीफ शेख (वय 65) यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले असून त्यांना सात टाके घालावे लागले. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कर्मचारी प्रशांत घरटे (वय 42) यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी दहशतीच्या छायेत आहेत.

मागणीवर दुर्लक्षच…
मागील तीन-चार वर्षांपासून रुग्णालय परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे. परंतु पोलिस व प्रशासनाने कानाडोळाच केला आहे. परिणामी मोबाईल चोरी, दुचाकी चोरी, पेट्रोल चोरी, वारंवार धमक्या अशा घटनांचा सपाटा सुरूच असून शनिवारी मध्यरात्रीच्या हल्ल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

काम बंदचा इशारा…
भीतीच्या छायेत काम करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांनी “आमच्या सुरक्षेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर आम्ही काम बंद आंदोलन छेडू” असा इशारा दिला आहे. उद्या सकाळी नऊ वाजता सर्व कर्मचारी गेटवर जमून आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हा दाखल, पण पुढे काय…?
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, गुन्हे नोंदवले जात असले तरी त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कर्मचारी व डॉक्टरांनी केला आहे.

आरोप-प्रत्यारोपाची नवी मालिका

  • कर्मचाऱ्यांचा आरोप : आम्ही वारंवार पोलीस चौकीची मागणी केली, पण कुणी ऐकून घेतले नाही. आता जीव धोक्यात घालून काम करायचे कसे?
  • पोलीस प्रशासनाची सफाई : गुन्हा दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. लवकरच कारवाई होईल.
  • नागरिकांची टीका : रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या जीवाशी संबंधित ठिकाण आहे. तिथे जर सुरक्षितता नसेल तर सामान्य माणूस कुठे सुरक्षित राहणार?

या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन व पोलिसांची कामगिरी उघड झाली आहे. आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयालाच दरोडेखोरांचा विळखा पडतोय आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!