


महिलांचे कुंकू पुसणाऱ्या गुटखा माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा – राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे यांची प्रशासनाला झोडपणी
जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील गुटखा माफिया सतीश उर्फ लाला जयस्वाल याच्या कृत्यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असताना, पोलिस प्रशासन मात्र गप्प बसलेले आहे. या गुन्हेगाराला वेळीच आवर घालून एमपीडीए अंतर्गत तडीपार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे यांनी केली आहे.
गुटखा व मावा विक्रीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, महिलांचे कुंकू पुसले जात आहे, तर तरुणाई व्यसनाधीनतेच्या दलदलीत ओढली जात आहे. तरीसुद्धा गुटखा माफिया जयस्वाल विरुद्ध कारवाई करण्याऐवजी पोलीस प्रशासनाचे मौन संशयास्पद असल्याचा थेट आरोप शितल बारोटे यांनी केला.
पोलिस प्रशासन जर गुटखा माफियांना संरक्षण देणार असेल, तर हा जनतेचा विश्वासघात आहे. लोकांचे आरोग्य, महिलांची घरे उध्वस्त करून संपत्ती गोळा करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली नाही, तर युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला.
शहरात उघड्यावर गुटखा विक्री सुरू असतानाही संबंधितांवर कुठलीही ठोस दखल न घेणे, हा थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असल्याचे बारोटे यांनी स्पष्ट केले. महिलांच्या डोळ्यांतील अश्रू, कुटुंबांचे विनाश, तरुणाईची नासाडी — यासाठी जबाबदार गुटखा माफिया प्रशासनाने तत्काळ एमपीडीए लागू करून त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष
जालना शहरात गुटखा माफियाचा उच्छाद माजलेला असतानाही पोलीस अधीक्षकांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
गुटख्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असून महिलांचे कुंकू पुसले जात आहे, तरुणाई व्यसनाधीनतेच्या खाईत जात आहे.
गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही गुटखा माफिया सतीश उर्फ लाला जयस्वाल याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई होत नाही, ही बाब संशयास्पद ठरत आहे.
लोकशाही व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
