

मुसळधार पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठ धडपड – अंधारातून नागरिकांना दिला दिलासा
जालना (प्रतिनिधी) : जालना शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. विजांचा कडकडाट, गडगडाट आणि प्रचंड पावसामुळे वीजपुरवठा बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचे कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री. अल्ताफ सय्यद (बा. तंत्रज्ञ) आणि श्री. पांडुरंग कोरडे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांनी जीव धोक्यात घालून तातडीने घटनास्थळी पोहोचत अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
जीव धोक्यात घालून केलेली सेवा
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सामान्य लोकांच्या तोंडात लगेच कर्मचाऱ्यांविषयी काहीतरी बोलले जाते, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हेच कर्मचारी दिवसरात्र पावसाला, वादळाला, विजेच्या कडकडाटाला तोंड देत, जनतेला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी झटत असतात. त्यांनी केलेल्या कामाची किंमत कशातच मोजता येणार नाही.
वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना रात्री उशिरा पुन्हा वीज उपलब्ध झाली आणि दिलासा मिळाला. नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले. “पाऊस आणि विजेच्या भीतीमुळे आम्हाला बाहेर पडायलाही भीती वाटत होती, पण कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आमच्यासाठी रात्रभर मेहनत घेतली,” असे नागरिकांनी सांगितले.
महावितरणच्या या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी संकट काळात दाखवलेली धडपड ही केवळ कामगिरी नसून सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांच्या जीवनात अंधाराऐवजी प्रकाश नेणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
अनुभवी सहकाऱ्याचे सहकार्य
या कामात महावितरणमध्ये अनेक वर्षे सेवा बजावत असलेले श्री. जगनराव कुलवंत यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा मिळाल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात मोठी मदत झाली.
