विद्यार्थिनींच्या आंदोलनाने दोन तास ठप्प झाले हदगाव बसस्थानक

विद्यार्थिनींच्या आंदोलनाने दोन तास ठप्प झाले हदगाव बसस्थानक

आगारप्रमुखांकडून लेखी आश्वासन मिळताच आंदोलन मागे

हदगाव / प्रतिनिधी :
हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी बस थांब्यांवरील मनमानीविरोधात सोमवारी थेट हदगाव आगारात ठिय्या देत अनोखे आंदोलन केले. दुपारी दोन ते चार या दोन तासांत बसस्थानकातील एकही बस आत-बाहेर जाऊ शकली नाही. शेवटी आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पळसा, बरडशेवाळा व बामणी फाटा येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी हदगाव येथे शिक्षणासाठी येतात. राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी पासची व्यवस्था करून दिलेली असली तरी, अनेक बस चालक-वाहक उड्डाणपूल व बायपासने सरळ निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढूनही खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो. वेळेवर शाळा/महाविद्यालयात पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो.

या मनमानीला कंटाळून शाळा सुटल्यानंतर संतप्त विद्यार्थिनी थेट हदगाव बसस्थानकात आल्या व दोन्ही गेटवर बसून ठिय्या दिला. दोन तास बसस्थानकातील एकही बस बाहेर पडली नाही. आंदोलनामुळे बससेवा पूर्णपणे ठप्प झाली.

या परिस्थितीत आगारप्रमुख धर्माधिकारी यांनी विद्यार्थिनींना लेखी आश्वासन दिले की, हदगाव-नांदेड मार्गावरील सर्व बसेस पळसा, बरडशेवाळा व बामणी फाटा येथे अनिवार्य थांबा करतील. तसेच विभाग नियंत्रक नांदेड यांनाही याबाबत कळविण्यात येईल. त्यानंतरच विद्यार्थिनींनी आपले आंदोलन मागे घेतले.


आमदारांची तत्पर दखल

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट आगारप्रमुख धर्माधिकारी यांना फोन करून “विद्यार्थिनींना बस थांब्यांवर कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ देऊ नका” अशा सूचना केल्या. यामुळे विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!