एसपी साहेब… गुटखा माफिया सतीश जयस्वालला जेरबंद करायचे नसेल तर गुटखा विक्रीला अधिकृत परवानगीच द्या…!

एसपी साहेब… गुटखा माफिया सतीश जयस्वालला जेरबंद करायचे नसेल तर गुटखा विक्रीला अधिकृत परवानगीच द्या…!

गुटखा माफियाला पोलिसांचा आधार की जिल्ह्याचा संहार?

जालन्यात लाखो रुपयांचा गुटखा खुलेआम विकला जातोय, आणि तोही पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांसमोर. कायद्याने बंदी घातलेला हा घातक व्यापार सतीश उर्फ लाला जयस्वालसारख्या गुटखा माफियांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, की आता प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले नाही तर जनता नालायक ठरेल.

२० ऑगस्ट रोजी बदनापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तब्बल २३ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा आणि ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करून जयस्वालवर गुन्हा दाखल केला. याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे झाले, पण प्रत्येक वेळी तो आर्थिक देवाणघेवाण करून जामिनावर सुटतो आणि पुन्हा त्याच धंद्याला लागतो. हे चित्र केवळ एकाच व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.

आज जालन्यात गुटखा, मटका, दारू अशा अवैध धंद्यांचे साम्राज्य डोळ्यासमोर वाढतेय. मग सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न अगदी रास्त ठरतो – जर सर्व अवैध धंदेच पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालणार असतील, तर त्यांना थेट परवानगीच द्यावी का? कारण या छुप्या व्यवहारात हप्ते भरण्याऐवजी परवाने द्या आणि सगळ्यांचा उदनिर्वाह सुरू ठेवा. ही उपरोधिक हाक म्हणजेच जनतेच्या मनात साचलेला संताप आहे.

सर्वात भीषण बाब म्हणजे – जिल्ह्यातील शेकडो तरुण गुटख्याच्या आहारी जाऊन कॅन्सरसारख्या असाध्य आजारांना बळी पडत आहेत. शासन दरवर्षी “व्यसनमुक्ती दिन” आणि “तंबाखूमुक्ती दिन” साजरे करत असते; पण जालना जिल्ह्यात मात्र खुलेआम कोट्यवधींचा गुटखा विकला जातो. अशा दुटप्पी धोरणाचा अर्थ काय?

प्रशासनाने जयस्वालसारख्या माफियांवर केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये. त्याला एम.पी.डी.ए. अंतर्गत अटक करून दीर्घ मुदतीसाठी तुरुंगात टाकणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेतून त्याला संरक्षण देणाऱ्यांची काटेकोर चौकशी करून कठोर शिक्षा केली पाहिजे. अन्यथा “वरून दबाव” या नावाखाली चालणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उरणार नाही.

यापुढे अशा गुन्हेगारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर समाजातील संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, हे निश्चित. तेव्हा शासन व प्रशासनाने “जनतेचे आरोग्य” महत्त्वाचे की “गुटखा माफियांचे खिसे” – याचा निर्णय त्वरित घ्यावा.

जालन्यातील गुटखा माफियांचा गळा आवळला नाही, तर हा जिल्हा लवकरच कॅन्सरचा मुख्य केंद्रबिंदू बनणार आहे, आणि त्याची जबाबदारी केवळ गुटखा विक्रेत्यांची नव्हे तर पोलीस प्रशासनाचीही असेल.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!