पारध बु. येथे कौटुंबिक वादातून दुहेरी मृत्यू

पारध बु. येथे कौटुंबिक वादातून दुहेरी मृत्यू

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या, दोन लहान मुलांचे भवितव्य अंधारात

भोकरदन (प्रतिनिधी):
भोकरदन तालुक्यातील पारध बु. गावात शनिवारी पहाटे भीषण व हृदयद्रावक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान नामदेव अल्हाट (वय अंदाजे ३०) यांनी शनिवारी पहाटे आपल्या पत्नी कीर्ती (वय अंदाजे २५) हिच्या डोक्यात धारदार पाहरने वार करून ठार केले. त्यानंतर त्यांनी स्वतःच घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

या दाम्पत्याच्या पाच वर्षांच्या संसारात दोन लहान अपत्ये आहेत – मुलगा रुद्र (वय ५ वर्षे) व मुलगी स्वामीनी (वय २ वर्षे). या दोन निरागस जीवांचे भवितव्य आता अंधारमय झाले आहे.

समाधान व कीर्ती यांच्या संसारात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे समजते. कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी वसई (ता. सिल्लोड) येथे गेली होती. परंतु पती समाधान याने पाच-सहा दिवसांपूर्वी तिला जबरदस्तीने पारध येथे आणल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. कौटुंबिक कलहाच्या पार्श्वभूमीवरच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, पो.हे.का. प्रकाश सिनकर, शिवाजी भगत तसेच होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पोलिसांना पुढील तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. उशिरा रात्रीपर्यंत पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या दुहेरी मृत्यूमुळे पारध परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावकऱ्यांसह समाजातील संवेदनशील लोकांनी या बालकांच्या संगोपनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!