
वेगवेगळ्या अपघातात दोघांना चिरडले
चंदनझिरा ठाणे हद्दीतील घटना : वाहनचालकांविरुद्ध गुन्हा
जालना (प्रतिनिधी):
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि. २१) सकाळी दोन भीषण अपघात घडून दोघांचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची प्रकरणे जालना शहरातील बालाजी चौक आणि समृद्धी महामार्गावरील तांदुळवाडी शिवार येथे घडली. दोन्ही घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अपघात : बालाजी चौकात ट्रकखाली झोपलेल्या व्यक्तीचा मृत्यू
पहिली घटना सकाळी साडेदहा वाजता जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील बालाजी चौकात घडली. शिंदे हॉस्पिटलसमोर सिमेंट वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. सदर ट्रकच्या खाली एक व्यक्ती झोपलेला होता.
दरम्यान, चालकाने ट्रक पुढे नेण्यासाठी इंजिन सुरू केले. मात्र, ट्रकखाली झोपलेला व्यक्ती त्याच्या नजरेस पडला नाही. ट्रक पुढे जाताच त्याच्या समोरील चाक त्या व्यक्तीच्या वरून गेले आणि जागीच मृत्यू झाला. मृताचा चेहरा व डोके पूर्णपणे चिरडले गेल्याने ओळख पटली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र तागवाले, गंभीर पाटील, दीपक डेहंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
दुसरा अपघात : समृद्धी महामार्गावर चालकाचा दुर्दैवी मृत्यू
दुसरी घटना सकाळी साडेआठ वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील तांदुळवाडी शिवारात घडली. नागपूरकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच-०५, ईएल-१८०६) पंक्चर झाल्यामुळे चालकाने गाडी साईडला उभी करून स्टेफनीच्या साहाय्याने टायर बदलण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एमएच-४६, बीयू-०९३१) जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालक विजय प्रकाश शुक्ला (वय ३५, रा. जोगई, जि. बळीरामपूर, उत्तरप्रदेश) हा चिरडून जागीच ठार झाला. अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे हवालदार जितेंद्र तागवाले, शंकर रजाळे व जे. एम. कलानी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. त्यानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गुन्हे दाखल, तपास सुरू
या दोन्ही अपघातांमध्ये मृत्यू झाल्यानंतर ट्रकचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राठोड करत आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यात वाहनचालकांच्या बेपर्वाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
