
अंबड शहरात तोतया पोलिसांनी निवृत्त मुख्याध्यापकाला लुटले
अंबड/प्रतिनिधी
अंबड शहरात भरदिवसा दोन तोतया पोलिसांनी निवृत्त मुख्याध्यापकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भामट्यांनी तब्बल २ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्योदरी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव विठ्ठलराव शिंदे (वय ७२) हे बुधवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एका किराणा दुकानातून खरेदी करून त्यांच्या स्कुटीवरून घरी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना अडवून “आम्ही पोलीस आहोत, चोरीच्या प्रकरणात वाहने तपासणी सुरु आहे” असे सांगून तपासणीस सुरुवात केली.
यावेळी त्या इसमांनी शिंदे यांना फसवणुकीच्या पद्धतीने खिशातील औषधे, रोख ५०० रुपये, घड्याळ तसेच हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील लॉकेट एका रुमालात बांधण्यास सांगितले. मात्र घरी गेल्यावर रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले.
तत्काळ शिंदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि. अमोल गुर्ले करीत आहेत.
या घटनेमुळे वृद्ध आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट होत असल्याची चर्चा रंगत आहे.
