तळेगाव ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी २५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

तळेगाव ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी २५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

घनसावंगी तालुक्यातील कारवाई – बिल देण्यासाठी ५० हजारांची मागणी

जालना (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) विजय मोतीलाल शिंदे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) २५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

प्रकरणाचा उलगडा

तक्रारदाराने रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्याचे काम केले होते. त्यासाठी सुमारे ११ लाख ४० हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीत जमा झाले होते. मात्र बिलाचा चेक देण्यासाठी शिंदे यांनी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे धाव घेत तक्रार नोंदवली. प्राथमिक पडताळणीत लाचेची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले.

सापळा व कारवाई

यानंतर गुरुवारी दुपारी १२.१० वाजता जालना-अंबड रोडवरील अंबड चौफुली परिसरात, लक्ष्मी अँड राखी चाट भंडारासमोर सापळा रचण्यात आला. यावेळी पंचासमक्ष शिंदे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

जप्ती व पुढील कारवाई

अंगझडतीदरम्यान २५,००० रुपयांव्यतिरिक्त ९,२५० रुपये रोख व एक मोबाईल मिळून आला. या प्रकरणी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाची कारवाई

ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे यांच्या देखरेखीखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यासह एसीबीचे पथक सहभागी झाले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!