जालना शहरात महात्मा फुले मार्केट उभारणार – आमदार अर्जुन खोतकर
झोपडपट्टी धारकांना मिळणार पीआर कार्ड; समृद्धी महामार्ग प्रश्नावर व्यापक बैठक होणार
जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील व्यापारी व नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले असून महात्मा फुले मार्केट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आज (दि. 19 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
जालना शहरातील सिंधी समाजाच्या व्यापाऱ्यांनी महात्मा फुले मार्केटसाठी सातत्याने मागणी केली होती. अखेर आज झालेल्या चर्चेत हा मुद्दा निकाली निघाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
त्याचप्रमाणे जालना शहरातील पीआर कार्डाचा प्रलंबित प्रश्न देखील सुटण्याच्या मार्गावर आहे. झोपडपट्टी धारकांना लवकरच पीआर कार्डे मिळणार असल्याची खात्री आमदार खोतकर यांनी दिली. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या हक्काच्या घरासंदर्भातील मोठी अडचण दूर होणार आहे.
बैठकीत समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या संदर्भात शेतकऱ्यांच्या मुल्यांकनाच्या बाबी ऐकून घेतल्या असून, त्यावर लक्ष घालून मा. जिंदल यांना सूचना देऊन व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार खोतकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी यांच्याशी देखील या विषयावर फोनद्वारे सविस्तर चर्चा झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या बैठकीस आमदार हिकमत उढाण, शेतकरी नेते दिलीप राठी, जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, शिवसेना संपर्क नेते पंडित भुतेकर, युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, तसेच व्यापारी आणि शिंदे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महात्मा फुले मार्केट उभारणी, झोपडपट्टी धारकांना मिळणारी पीआर कार्डे आणि समृद्धी महामार्ग प्रश्नावर होणारी व्यापक बैठक या तिन्ही निर्णयांमुळे जालना शहर व जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
