

तीस तासांच्या शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह नदीतून सापडला
(घनसावंगी तालुक्यातील बहिरी नदीच्या पाण्यात गेले होते वाहून)
✍️ घनसावंगी/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सोमवारी (दि. १८) सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकरूखा येथील शेतकरी अण्णासाहेब कारभारी सानप (वय ७०) हे बहिरी नदीत वाहून गेल्यानंतर तब्बल ३० तासांच्या शोधमोहीमेअंती मंगळवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृतदेह दहीगव्हाण गावाजवळ सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता अण्णासाहेब सानप शेतातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांनी बहिरी नदीवरील ओहळ पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक पाय घसरल्याने ते प्रचंड प्रवाहात वाहून गेले. काही क्षणांतच ते पाण्यात अदृश्य झाले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर तहसील कार्यालय, नगर पंचायत घनसावंगी, तीर्थपुरी येथील कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चाललेल्या प्रयत्नांनंतरही काहीच निष्पन्न झाले नाही.
शेवटी मंगळवारी जालना येथून आलेल्या विशेष पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने नदी परिसरात जोरदार शोधमोहीम राबवली. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजता दहीगव्हाणजवळ त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर नदीकाठावर मोठी गर्दी जमली होती.
एकरूखा व परिसरातील गावांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. पावसाळ्यात नदी, ओहळ आणि नाल्यांमधील वाढत्या पाण्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
