
रामनगरच्या बाजारात पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांची गर्दी
बैल सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य बाजारात दाखल
शाम गिराम, सिंधीकाळेगाव
सिंधीकाळेगाव : शेतकऱ्यांचा मानाचा सण म्हणजे बैलपोळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यासाठी बाजारपेठेत मोठी लगबग दिसू लागली आहे. जालना तालुक्यातील रामनगर आठवडी बाजारात यंदा बैल सजावटीचे कासरे, मोरख्या, बोरखड्या, घागरमाळ, बाशिंग, अंगावर झुला, कवड्याच्या माळा, हिंगुळ आदी पारंपरिक साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
बाजारपेठेत शेतकऱ्यांची खरेदीची लगबग पाहायला मिळत असून यावर्षी रेडिमेड साजसामानालाही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. पोळ्यादिवशी देवदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा असल्याने नारळ विक्रीलाही भरघोस मागणी दिसत आहे.
शेतकऱ्यांचा सखा व शेतीतील खरा साथीदार असलेल्या सर्जा-राजाचा हा मानाचा दिवस असल्याने शेतकरी हक्काने व उत्साहाने सजावटीचे सामान खरेदी करत आहेत. श्रावण अमावास्येला येणारा बैलपोळा हा दिवस शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बैलांना नांगराला अथवा गाडीस जुंपले जात नाही तर त्यांचे पूजन करून सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
पोळा सण हा शेतकऱ्यांची बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस असून संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
रामनगर आठवडी बाजारात पोळा सणानिमित्त सर्जा-राजासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करताना शेतकरी
(छायाचित्र : शाम गिराम, सिंधीकाळेगाव)
