ट्रकच्या धडकेत ॲपेरिक्षाचा चुराडा – तीन ठार

ट्रकच्या धडकेत ॲपेरिक्षाचा चुराडा – तीन ठार

स्लग : जालना-राजूर रोडवरील शौर्य लॉन्सजवळील भीषण अपघात

जालना / प्रतिनिधी
जालना-राजूर मार्गावर शौर्य लॉन्सजवळ रविवारी (दि. १७) सायंकाळी सहा वाजता घडलेल्या भीषण अपघातात ॲपेरिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने ॲपेरिक्षाला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून या दुर्घटनेमुळे मांडवा गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये भरत निवृत्ती खोसेगणेश तुकारामप्पा बारसे व सुनिता नारायण वैद्य (सर्व रा. मांडवा, ता. बदनापूर) यांचा समावेश आहे.

अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, मांडवा येथील नारायण वैद्य हे पत्नी सुनिता वैद्य यांच्यासह दुचाकीवरून सिमेंट खरेदीसाठी जालना येथे आले होते. सिमेंट न मिळाल्याने त्यांनी पत्नीला गावातील ॲपेरिक्षाचालक भरत खोसे यांच्या गाडीत बसवले. त्यात गणेश बारसे देखील प्रवासी होते. ॲपेरिक्षा मांडव्याच्या दिशेने निघत असताना राजूरकडून वेगाने येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने (क्र. आरजे ०१ जीबी ८४६८) समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा जबर होता की ॲपेरिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला व तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिक व वाहनचालक तातडीने मदतीला धावून आले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक बाळू चव्हाण व सुनील छडीदार यांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिन्ही प्रवासी मृत असल्याचे घोषित केले.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून चंदनझिरा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

या अपघातामुळे मांडवा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रस्ते सुरक्षा आणि ट्रकचालकांच्या बेफिकीरपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!