

जालना (प्रतिनिधी) : आसरखेडा (ता. बदनापूर) शिवारात दोन महिन्यांच्या बालिकेला विहिरीत फेकून निर्दयीपणे खून करणाऱ्या गुन्ह्याचा तपास शास्त्रशुद्ध व तांत्रिक पद्धतीने करून आरोपी माता-पित्यांचा शोध घेण्यात यशस्वी ठरलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार जितेंद्र तागवाले यांचा स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
ही दुर्दैवी घटना घडल्यावर आरोपींबाबत कोणतेही ठोस धागेदोरे नसतानाही हवालदार तागवाले यांनी गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्ण रीतीने केला. तांत्रिक साधनांचा वापर, घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण, तसेच चौकस गुप्त तपास याद्वारे त्यांनी सत्य उघडकीस आणले आणि बालिकेच्या खुनामागील सत्य समोर आणले.
या कार्याबद्दल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित मुख्य सोहळ्यात हवालदार तागवाले यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानामुळे पोलिस विभागातील प्रामाणिकपणा, चिकाटी आणि तांत्रिक कौशल्याचा पुनःश्च गौरव झाला आहे.
