


बदनापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त बदनापूर शहरात बेरोजगार आणि गरजू महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट व शिवणकला प्रशिक्षण क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शासन मान्यता प्राप्त युवा इंडिया टेक्निकल इन्स्टिट्युट तर्फे करण्यात आले असून महाराष्ट्रातील अल्पसंख्याक 16 ते 45 वयोगटातील युवती व महिलांसाठी हा उपक्रम 100% मोफत आहे. प्रथम लक्ष्मी मातेचे पूजन करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख म्हणून अर्चना बोर्डे, सरिता सांगवे, रेणुका चव्हाण व अश्विनी डांगे उपस्थित होत्या. अर्चना बोर्डे यांनी महिलांना या प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांनी या कोर्समध्ये सहभागी होण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्ट कोर्सअंतर्गत फेशियल, वॅक्सिंग, हेअर कट, हेअर कलर, हेअर स्टाईल, मेकअप, ब्रायडल मेकअप, थ्रेडिंग यांसारख्या सर्व बाबींवर प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाईल. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार असून, शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
या कोर्ससाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून कोणतीही फी आकारली जाणार नाही. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो, तसेच इयत्ता दहावीची मार्कशीट किंवा टीसी झेरॉक्स जमा करावी लागेल. व्यावसायिक शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार असून इच्छुक महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
