
पालकमंत्रींचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकाला डिवायएसपीकडून ‘फिल्मी’ लाथ
जालना : स्वातंत्र्य दिनी घडली धक्कादायक घटना; उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
जालना (प्रतिनिधी) – काही महिन्यांपूर्वी जालन्यात झालेल्या बैठकीदरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊ पाहणाऱ्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी कॉलर पकडून फरफटत नेले आणि खाली पाडत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या घटनेला अवघे काही महिनेही उलटले नाहीत, तोच आज स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा अशाच धक्कादायक प्रकाराने जालना पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जालना दौऱ्यात आंदोलकाला उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत जाऊन ‘फिल्मी स्टाईल’ लाथ मारल्याचा प्रकार समोर आला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, ताब्यात घेतलेल्या आंदोलकाच्या कमरेत पाठीमागून लाथ घालण्यात आली.
घटना कशी घडली?
कदीम जालना पोलीस ठाण्यात चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंकजा मुंडे जालन्यात आल्या असताना आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, मात्र या वेळी आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. याच क्षणी डिवायएसपी कुलकर्णी यांनी ‘फिल्मी’ अंदाजात धावत जाऊन लाथ घातल्याचा व्हिडिओ आणि वर्णन चर्चेत आहे.
आंदोलक गोपाल चौधरी आणि रमेश चौधरी यांनी पोलिसांच्या वर्तणुकीचा तीव्र निषेध नोंदवत, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
