भरत ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी

भरत ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी

पाणी मागत दुकानात प्रवेश… ग्राहकांची नजर चुकवत श्रीकृष्णाच्या चार मुर्त्या लंपास!

जालना (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भरत ज्वेलर्समध्ये बुधवारी रात्री घडलेली घटना शहरवासीयांना हादरवून गेली. देवाचे अलंकार पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकांच्या गर्दीत पाणी मागत दुकानात प्रवेश केलेल्या एका अज्ञात भामट्याने क्षणाचाही विलंब न लावता दीड लाख रुपये किंमतीच्या श्रीकृष्णाच्या चार दगडी मुर्त्या असलेली लेदर बॅग लांबवली.


गुन्हा असा उघडकीस आला

माळीपिंपळगाव येथील चातुर्मास आश्रमाचे सेवक चिराग मराठे हे त्यांचे गुरुबंधु धीरज पंडीत यांच्यासह बुधवारी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास भरत ज्वेलर्समध्ये आले होते. त्यांनी सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या लेदर बॅगेत १२ ते १३ इंच उंचीच्या, सोने–चांदीच्या आवरणाने मढवलेल्या श्रीकृष्णाच्या चार दगडी मुर्त्या होत्या. दुकानात देवासाठी चांदीच्या टिकल्या व इतर आभूषणे पाहताना त्यांनी ती बॅग बाजूला ठेवली.

याच क्षणी एक अज्ञात व्यक्ती पाणी पिण्याच्या बहाण्याने दुकानात शिरली. कोणाच्याही लक्षात न येता त्याने बॅग उचलली आणि क्षणात गायब झाला. ग्राहकांची नजर चुकवून केलेली ही चोरी सिसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.


मुर्त्यांची किंमत दीड लाख

या लेदर बॅगेत असलेल्या चारही मुर्त्यांची बाजारभावाने किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये एवढी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आश्रमासाठी विशेष पूजेसाठी आणलेल्या या मुर्त्या चोरीस गेल्याने धार्मिक वर्तुळात खळबळ माजली आहे.


पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी चिराग मराठे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सकृद्दीन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!