अर्धापूर शहराची ओळख : खड्ड्यांचे शहर!जनतेचा त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष…

अर्धापूर / प्रतिनिधी

अर्धापूर शहराची ओळख आता जिल्हाभर “खड्ड्यांचे शहर” म्हणून होत आहे. शहरातील मुख्य रस्ते असो वा उपरस्ते – सर्वत्र खड्डेच खड्डे. त्यात पावसाचे पाणी साचून नागरिकांना व वाहनधारकांना दुप्पट त्रास सहन करावा लागत आहे.

उत्सवापूर्वीच काळजी वाढली

काही दिवसांवर अण्णाभाऊ साठे जयंती, गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सव येऊन ठेपले आहेत. या काळात शहरातून मिरवणुका व शोभायात्रा निघतात. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे अपघात, अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात गंभीर चर्चा रंगली असून प्रशासनावरील नाराजी वाढली आहे.

रस्त्यांची दुर्दशा

  • पावसाळ्यापूर्वी व नंतरची दुरुस्तीची कामे वेळेत झाली नाहीत.
  • आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
  • दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना अपघात होत असून पोलिस ठाण्यापर्यंत वाद पोहोचतात.
  • खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान आणि चालकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.

आरोग्य धोक्यात

ड्रेनेजच्या कामामुळे अनेक रस्ते खोदले गेले आहेत. काही भागात तर घाण पाणी रस्त्यावर आले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
नगरपंचायत कार्यालयाजवळील जि.प. कन्या शाळा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. शाळेत दारू व मटक्याचा अड्डा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नागरिकांचा संताप

शहरातील वृद्ध, महिला व लहान मुलांना सुरक्षितपणे चालणेही अवघड झाले आहे. “नगरपंचायत आहे तरी का?” असा सवाल नागरिकांमध्ये चर्चेत आहे.
लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर पाच वर्षांनीच जनता भेटते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

इशारा

“रस्ते, खड्डे, नाले व साचलेले पाणी या समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत, तर आम्ही मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार-खासदार यांच्याकडे तक्रार देऊन आंदोलन करू,” असा इशारा शहरातील शिष्टमंडळाने दिला आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!