
“कुलकर्णी साहेब, हे पोलीसगिरीचं नाटक की ‘ॲक्शन’ फिल्म?”
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णींचा खुलासा म्हणजे ‘पोर खेळ’ – प्रत्यक्ष घडले मात्र वेगळंच! सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
जालना/संतोष भुतेकर
स्वातंत्र्य दिनानंतर शहरात उडालेल्या ‘ॲक्शन’ ड्रामाचा आणि पोलीसांच्या खुलाशाचा ताळमेळ साधणे म्हणजे अक्षरशः मेंढीला बिबट्याचे कातडे घालण्यासारखे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांनी केलेला खुलासा ऐकला, तर वाटेल की पोलीस कारभार म्हणजे न्याय, मदत आणि कायद्याची कडक अंमलबजावणी! पण प्रत्यक्षातली दृश्यं? – सिनेमा हॉलमध्ये दाखवायचीच राहिली!
गोपाल चौधरी नावाचा एक नागरिक, ज्याच्या वैयक्तिक आयुष्यात कौटुंबिक वाद आणि पत्नीने केलेलं दुसरं लग्न – या गोष्टी त्याच्याबाबत आहेत, हे कुलकर्णी साहेबांनी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये ‘मोठा खुलासा’ म्हणून मांडलं. परंतु, आपली चोरी लपवण्यासाठी मीडिया स्टंट केला असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया नंतर उघड झाले आहे.
पोलीसांनी त्याला “योग्य ती मदत”ही दिली, असंही ते म्हणाले. मात्र, खरी परिस्थिती – पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य माणसाला मदत मिळणं हे सध्या पाण्यात शंख वाजवण्यासारखं झालं आहे. चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागितला, तेव्हा त्यांच्यावर आठ-दहा पोलिसांनी झडप घालून चक्क बेड्या ठोकल्या सारखे पकडून ठेवले होते. एवढंच नव्हे, तर कुलकर्णी साहेबांनी स्वतः मागच्या बाजूने ‘फिल्मी स्टाईल’ने लाथा झाडल्या – तेही लोकांच्या आणि मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर! आणि आता त्यांच्याकडून झालेल्या चुकीला दाबण्यासाठी सोशल मीडियावर किंवा मीडियासमोर जर ते आपली प्रतिक्रिया देत असेल तर ही शोकांतिका का म्हणू नये.
डिझेलचा खेळ आणि वेगळं वळण
चौधरी यांच्या हातात डिझेल असावं, पण त्याचा उद्देश काय – हे अजूनही अस्पष्ट. मात्र पोलीसांसोबतच्या झटापटीत काही थेंब महिला पोलिसांवर उडाले असतील, इतकंच. पण हेच प्रकरण पोलिसांनी असा रंगवलं की – “त्याने चक्क महिला पोलीसांवर डिझेल ओतलं!” म्हणजे बघा, वास्तव वेगळं आणि दाखवणं वेगळं.
‘बाळाचा वापर’ की ‘बाहुबली स्टाईल’ धुलाई?
कुलकर्णी साहेबांचा दावा : त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला बाळाचा वापर करावा लागला.” अरे वा! आधीच तो पोलिसांच्या ताब्यात, तरीही बाळाचा वापर? मग लाथांचा वर्षाव का? हा बोनस सीन? तर नाही ना?
खुलासा की खोटारडेपणा?
जे प्रकरण प्रत्यक्षात लोकांसमोर उघडपणे घडलं, ते निंदनीयच नाही तर पोलिसांच्या वागणुकीवर काळं ढग आणणारं आहे. त्यावर पडदा टाकण्यासाठी मीडिया समोर तयार केलेला ‘व्हिडिओ खुलासा’ म्हणजे खोटारडेपणाचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचेही काही सामाजिक संघटने कडून बोलले जात आहे.
कायद्याच्या रखवालदारांकडून अशा प्रकारची ‘ॲक्शन हिरो’गिरी केवळ लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. जनता न्याय मागायला आली, आणि तिला मिळालं – बेड्या, लाथा आणि खोटं रंगवलेलं प्रकरण!
डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांची मुज्जोरी!
आंदोलक आला दाद मागायला; पोलीसांनी घातली कमरेत लात!
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी आलेल्या आंदोलकाला पोलिसांनी अक्षरशः बेड्या ठोकल्या सारखे पकडून असताना डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी ‘फिल्मी स्टाईल’ने कमरेत लाथ झाडत नेत ‘ॲक्शन सीन’ गाजवला. असल्याचे आंदोलकांनी आरोप करत पोलिसांनी त्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, म्हणून तो पालकमंत्र्यांना भेटायला आला होता. मात्र, त्याचा आवाज ऐकण्याऐवजी त्याला अतिरेकी असल्यासारखं वागवले गेले असल्याचेही म्हटल्या जात आहे.
चिमुकलीच्या डोळ्यांसमोर बापावर लाथा
कुलकर्णी साहेब… हाच का न्याय?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेली घटना केवळ आंदोलकावरचा अन्याय नाही, तर एका चिमुकलीच्या मनावर कोरलेली भीतीची जखम आहे. तक्रारदार गोपाल चौधरी आपल्या लहान मुलीसह जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. उद्देश एकच – आपल्या तक्रारीला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणे. मात्र, या चिमुकलीच्या डोळ्यांसमोरच तिच्या बापाला पोलिसांनी घेरून बेड्या ठोकल्या सारखे पकडून आणि डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी कमरेत लाथा झाडल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती मुलगी भेदरून गेली. ज्यांनी नागरिकांच्या सुरक्षेची शपथ घेतली, त्यांनीच एका मुलीच्या मनावर भयाचं ओझं टाकलं – हे दृश्य पाहून उपस्थितांनाही संताप आला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जालना जिल्ह्यातून तीव्र निषेध व्यक्त होऊ लागला. लोकांचा सवाल – “कुलकर्णी साहेब, चुकीचं करूनही त्यावर पडदा टाकणं, आणि जणू काही काहीच घडलं नाही अशा तोऱ्याने खुलासा करणं – हे कितपत योग्य?”
जनतेचा आक्रोश स्पष्ट आहे – पोलिसांनी जर अशा पद्धतीने वागणूक दिली, तर सर्वसामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?
