
अंबड/जहीर शेख
शहरात मोकाट जनावरांनी मुख्य रस्त्यांवर हैदोस घातला असून यांच्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे या जनावरांना बंदिस्त ठेवण्यासाठी पूर्वी शहरात एक कोंडवाडा होता परंतु तो आज अस्तित्वात नसल्याने मोकाट जनावरे ठेवण्यासाठी अंबड नगर पालिकेला जागा सापडत नसल्याचे दिसते कोंडवाड्याचा देखील प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही.त्यामुळे अंबड शहरात गावभर फिरणारी आणि रस्त्यात ठाण मांडलेली गुरे चिंतेचा विषय झाली आहेत.अनेक ठिकाणी या उनाड गुरांनी लहान मुलांवर व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या असून शाळेतील लहान लहान मुलांसह नागरिक आणि वाहनचालकानाही आता या गुरांची दहशत धास्तावू लागली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ,जालना बीड महामार्ग, महावीर चौक, रजा बेस, मदिना चौक,भाजी मंडी, पोलीस कॉलनी, पेठ गल्ली, पोलीस स्टेशन समोर, अशा एक ना अनेक ठिकाणी ही गुरे ठाण मांडून बसलेली असतात. रस्त्याच्या मधोमध उभ्या राहिलेल्या जनावरांना चुकवताना वाहनधाररांना मोठी कसरत करावी लागते. नगर पालिका प्रशासन गुरांचा बंदोबस्त करण्यात तसेच संबधित जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यास नेहमीच कमी पडत असल्याचे चित्र आहे. मात्र आता तरी मोकाट गुरांबाबत नगरपालिका ठोस उपाययोजना करणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या मधोमध बसलेली गुरे वाहनांची वर्दळ असली तरी जागची हलत नाहीत. पाऊस पडो अथवा गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न वाजोत, ही गुरे एकाच जागी बसून राहतात. शहरात मोकाट जनांवरांना पकडून ठेवण्यासाठी कोंडवाडा नसल्याचा फायदा गुरांचे मालक घेत आहेत, तसेच अनेक गुरांना पशुसंवर्धन विभागाकडून टॅगही मारण्यात आलेले नाहीत. रात्रीच्यावेळी ती कधीकधी दिसतही नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या उनाड़ गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांप्रमाणेच दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांकडून केली जात आहे.
